
Snehalay: युवा निर्माण शिबिराचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
Snehalay: ‘स्नेहालय’ संस्थेच्या वतीने १२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अहमदनगर औद्योगिक वसाहती मधील ‘स्नेहालय’ पुनर्वसन संकुलात ‘युवा प्रेरणा शिबिराचं’ आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या शिबीराचे औपचारिक उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज १३ ऑगस्ट संपन्न झाला. ‘स्नेहालय’च्या ‘युवा निर्माण प्रकल्पा’च्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेचे वंचित व उपेक्षितांसाठी असलेल्या प्रकल्पांचे कार्य आणि देश-विदेशातील उपक्रमशील तरुणाईस जोडणारा ‘युवा निर्माण प्रकल्पाचा’ घेतलेला धांडोळा..!
Snehalay: ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे ब्रीद वाक्य असलेली अहमदनगर मधील ‘स्नेहालय’ संस्था म्हणजे वंचित, उपेक्षितांचे हक्काचे ठिकाण
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे ब्रीद वाक्य असलेली अहमदनगर मधील ‘स्नेहालय’ संस्था म्हणजे वंचित, उपेक्षितांचे हक्काचे ठिकाण. एचआयव्ही’बाधित महिला, मुलं-मुली, तस्करी, लैंगिक हिंसाचारांने पिडीत, गरीब निराधार महिला, मुले आणि तृतीयपंथीय समुदायांना आधार देण्यासाठी ‘स्नेहालय’ची १९८९ मध्ये डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी स्थापन केली. ‘स्नेहालय’चं काम आज विस्तारलं आहे. पुनर्वसन, आरोग्य सेवा, शिक्षण व जाणीव-जागृती या चार क्षेत्रांमध्ये विविध प्रकल्पांच्या माध्यमातून ‘स्नेहालय’चं काम सुरू आहे.
‘चाईल्डलाईन’, ‘स्नेहांकुर’, ‘बालभवन’, ‘एचआयव्ही समुपदेशन केंद्र स्पृहा’ व ‘हिम्मतग्राम’ आदी प्रकल्पांच्या माध्यमातून ‘स्नेहालय’चे काम सुरू आहे. महिला व लहान मुलांना मदत करता यावी म्हणून १९९६ सालापासून सुरू केलेल्या हेल्पलाईनचे रूपांतर २००३ साली ‘चाईल्डलाईन’ मध्ये करण्यात आले. दररोज ५० हून जास्त बालकांचे फोन घेतले जातात. बालकामगारांची मुक्तता, कर्करोग, ह्दयरोग, लैगिंक शोषण इत्यादी विषयांवर ‘चाईल्डलाईन’ ची अनेकांना मदत झाली आहे.
‘स्नेहांकुर’ या प्रकल्पाच्या माध्यमातून अनाथ, बेवारस व कुमारी मातांच्या बालकांना आधार

‘स्नेहांकुर’ या प्रकल्पाच्या माध्यमातून अनाथ, बेवारस व कुमारी मातांच्या बालकांना आधार दिला जातो. ‘स्नेहांकुर’मधील बालकांना कायदेशीररीत्या दत्तक घेण्यात येऊन त्यांना चांगलं आयुष्य देण्याचाही प्रयत्न केला जातो. ‘स्नेहालय’ २००३ पासून ‘बालभवन’ उपक्रम चालवते. बालकांचे आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणांवर बालभवनचा भर असतो. पाठ्यपुस्तकातील शिक्षणासोबत शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग सारखे कौशल्य वृध्दीचे प्रशिक्षण कार्यक्रम ही शिकविले जातात. सामाजिक ऐक्य, बालविवाहाची कुप्रथा, आरोग्याची काळजी, व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम या सारख्या विषयांवरही जागृती केली जाते. ‘एचआयव्ही’ झालेल्या सुमारे २५०० रुग्णांना ‘स्पृहा’ समुपदेशन केंद्राने मनोबल, मोफत उपचार दिले आहेत.
अहमदनगरजवळच ‘हिसळक’ या गावी २५ एकर परिसरात वेश्यावस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी ‘हिम्मतग्राम’ हा प्रकल्प उभा राहिला
अहमदनगरजवळच ‘हिसळक’ या गावी २५ एकर परिसरात वेश्यावस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी ‘हिम्मतग्राम’ हा प्रकल्प उभा राहिला आहे. याठिकाणी २००९ पासून वंचित, उपेक्षितांचे कुटुंबीय शेती करत आहेत. यामाध्यमातून ६० कुटुंबाचे पुनर्वसन झाले आहे. ‘स्नेहालय’चं पुनर्वसन संकुल असून, तिथे लालबत्ती भागातली गरीब, निराधार, अनौरस, ‘एचआयव्ही’ बाधित मुलं-मुली आहेत. त्यांना तिथं राहता येतं, चांगलं भोजन, आरोग्य, शिक्षण देण्याचं काम या संकुलामार्फत घडतं.
या मुलांना पालकही मिळतात, जे त्यांना मानसिक आधार देण्याचं काम सातत्यानं करतात. या संस्थेत आज ४०० च्या वर मुलं-मुली असून, आजपर्यंत हजारो मुलामुलींनी याचा लाभ घेतला आहे. देहव्यापारात अडकलेल्या, तसंच कला केंद्र, तमाशाचं क्षेत्र यातल्या स्त्रियांचे जीवन बदलावे, यासाठी ‘स्नेहालय’च्या ‘स्नेहज्योत’ या उपक्रमाद्वारे प्रयत्न केला जातो आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

या प्रकल्पाचा लाभ नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या साडेतीन ते चार हजार स्त्रियांनी घेतला असून, आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. तसेच समलिंगी, तृतीयपंथी स्त्री-पुरुष यांच्या आरोग्यावरही इथे काम केले जाते. त्यांना हव्या त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
अहमदनगर जिल्ह्यात एकही अल्पवयीन मुलगी देहव्यापाराच्या क्षेत्रात दिसता कामा नये, अशी कठोर भूमिका घेऊन ‘स्नेहालय’चं मुक्ती वाहिनी पथक प्रयत्नशील असून, असाच प्रयत्न राज्यभर करण्याचाही त्यांचा मानस आहे. ‘स्नेहाधार’ प्रकल्पांतर्गत विधवा, परित्यक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त स्त्रिया यांना निवास, भोजन, कायदेशीर सल्ला, समुपदेशन दिले जाते. याचा लाभही अनेक स्त्रिया घेत आहेत. शोषित, वंचित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी २०११ पासून ‘स्नेहालय’चं कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू झाले असून, या घटकांना आपला हक्काचा आवाज देण्याचे काम या रेडिओमार्फत केले जाते.
आज ‘स्नेहालय’च्या हितचिंतकांमध्ये एस.एन. सुब्बाराव, डॉ. निकोलस नोबेल, डॉ. मार्सिया वॉरेन, आमिर खान, अण्णा हजारे, डॉ. विकास आमटे, पोपटराव पवार, मामा कौंडिण्य या मान्यवरांसह ४० हजारांहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. ‘स्नेहालय’ व डॉ. गिरीष कुलकर्णी यांना अनेक राष्ट्रीय खाजगी आणि शासकीय पुरस्कार मिळाले. ५ नोव्हेंबर २०१२ रोजी भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी यांनी डॉ. दुर्गाबाई देशमुख राष्ट्रीय पुरस्कार देऊन ‘स्नेहालय’च्या पथदर्शी कार्याला गौरविले आहे.

Snehalay: युवा निर्माण प्रकल्प :-
तरुणाईचे चारित्र्यनिर्माण आणि त्यांना सेवा कार्याची प्रेरणा देण्यासाठी ‘युवा निर्माण’ हा प्रकल्प वर्ष २००० पासून ‘स्नेहालय’ चालवते. या उपक्रमाद्वारे दरवर्षी ४ युवा शिबिरे आणि काही सायकल यात्रांचे आयोजन केले जाते. समाजातील प्रश्नांचा सखोल अभ्यास आणि विविध सेवा कार्यांची अनुभूती देण्याचा उद्देश यामागे असतो. प्रत्यक्ष सेवा कार्य करणाऱ्यांना प्रारंभिक मदत आणि मार्गदर्शन ‘युवा निर्माण’ देते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘युवा निर्माण शिबिरास’ अहमदनगर येथे आज, १२ ऑगस्ट २०२२ पासून सुरूवात झाली आहे.
या शिबिराचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (शनिवार, १३ ऑगस्ट २०२२) होणार आहे. स्नेहालय ,अनामप्रेम ,विद्यार्थी सहायक समिती ( श्रीगोंदे),स्नेहप्रेम ( कर्जत ) यांच्या माध्यमातून भारत, बांगलादेश , नेपाळ , बाली ( इंडोनेशिया) या देशांमधील १०० आणि भारतातील २५० विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित हे युवा निर्माण शिबीर १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालणार आहे. युवा निर्माण प्रकल्पात अहमदनगर ते नोखाली ( बांगलादेश) ही ४२८० किलोमीटर अंतराची ‘सद्भावना सायकल यात्रा’ १५० तरुणांसह काढण्यात आली होती.
– सुरेश पाटील, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, शिर्डी.