
Ahmednagar Congress: जनसभा यात्रेचे चौका, चौकात स्वागत,जेसीबीतून पुष्पवृष्टी
Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी) : जनसंवाद यात्रेदरम्यान बाजारपेठेतले व्यापारी सांगत होते निम्मा सुद्धा व्यापार राहिला नाही. वातावरण कठीण आहे. तुम्ही काहीतरी करा. काही लोक वातावरण खराब करतात. दहशत करतात. जाती, जातीत भेद निर्माण करतात. यामुळे व्यापार खराब होतो. आम्हाला शांत आणि बंधुत्वाचा वातावरण असणार, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार वातावरण शहरात करायचा आहे. पण त्यासाठी किरण काळेंना आमदार व्हावं लागेल, अस म्हणत विधानसभेसाठी काळेंच्या उमेदवारीचे थेट सुतोवाच माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी जनसंवाद सभेला संबोधित करताना केले.
कसब्याचे आ. रवींद्र धंगेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडेंची यावेळी प्रमुख उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली. शिवकालीन खेळांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. काळे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करत यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. काळेंनी नगर शहराचा राजकीय मूड बदलून टाकल्याची चर्चा यामुळे शहरात सुरू झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत शहराच्या ग्रामदैवत विशाल गणपतीची आरती केली. भिंगरवाला चौकातील जैन मंदिराला भेट दिली. दर्ग्याला चादर अर्पण केली. यावेळी यात्रेत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रा एमजी रोडवर येताच कार्यकर्त्यांनी काळेंना खांद्यावर घेत जोरदार घोषणाबाजी केली. चौका, चौकात व्यापारी, हात गाडीवाले, फेरीवाल्यांनी थोरात, धंगेकर, काळे यांचे सत्कार करत संवाद साधला. शहाजीराजे चौकात जेसीबीतून नेत्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चितळे रोडवर भव्य जनसंवाद सभा पार पडली. यापूर्वी शिवालयात जाऊन काँग्रेस नेत्यांनी स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्वागत केले.
स्व.अनिलभैय्या यांनी गुंडगिरी विरुद्ध लढा दिला संघर्ष केला : आ. थोरात
सभेला संबोधित करताना आ. थोरात म्हणाले, शहरात दहशतीच वातावरण आहे. स्व.अनिलभैय्या यांनी गुंडगिरी विरुद्ध लढा दिला. संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने शहराचा मोठा तोटा झाला. प्रश्न पडला इथून पुढे ही लढाई कोण करणार. शहराच्या पाठीशी कोण उभा राहणार. आणि त्यावेळेस किरण काळे हे नेतृत्व आम्हाला दिसलं. हा गडी ना खायला मिळल म्हणून जाईल, ना दहशतीला घाबरल. तो भक्कम, हिम्मतवाला आहे. गरीबाच्या पाठीशी उभी राहण्याची त्याची ताकद, इच्छा आहे. जिथे अन्याय तिथ किरण. तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नगरकरांसाठी लढाई करू शकतो.
थोरात पुढे म्हणाले, यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. हे मोठे यश आहेत. पण न दिसणारे, न बोलणारे हजारो नगरकर तयार आहेत. ते म्हणतात तुम्ही किरणला उमेदवारी द्या. आम्ही निवडून देऊ. शहराचा विकास कसा करता येईल, रोजगार कसे निर्माण करता येतील, व्यापार कसा वाढेल हे सगळं कोणीतरी पाहण्याची गरज आहे. शहरात अलीकडे परिस्थिती कठीण झाली आहे.
आ. धंगेकर म्हणाले, मराठा, धनगर, ओबीसी सगळ्यांना या सरकारने आश्वासन दिली. पण आता हात वर केले. जनतेला दिशाहीन करण्याचं काम मोदींनी केलं. समाजाला चांगलं, वाईट कळत असतं. किरण काळेंनी जे पेरल आहे ते भविष्यात नक्की उगवेल, असं म्हणत धंगेकरांनी काळेंचं कौतुक केलं. कसब्यातील ऐतिहासिक विजयाबद्दल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने किरण काळेंच्या हस्ते यावेळी धंगेकरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
किरण काळेंनी यावेळी भावनिक भाषण करत नगरकरांना साद घातली. शहरातल्या हत्याकांडांवर मी निर्भीड भूमिका घेतली म्हणून मला सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून पोलिसां मार्फत नोटिसा बजावल्या. चौकशीसाठी बोलवलं. मला पोलिसांना दोष द्यायचा नाही. मी खकीचा आदर करतो. पण बनावट आयटी पार्कचा भांडाफोड केला म्हणून माझ्या विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. सखोल तपास झाला.फिर्यादच खोटी होती. गुन्हा घडलाच नाही असा पोलिसांनीच कोर्टात रिपोर्ट सादर केला. दूध का दूध, पाणी का पाणी झालं. एवढं नीच राजकारण केलं गेलं. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.
हवेत तिरंगा फुगे सोडून आनंदोत्सव साजरा
जनसंवाद यात्रा व सभेच्या निमित्ताने काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चे बांधणी शहरात केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मनोज गुंदेचा, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे, विलास उबाळे यांची आक्रमक भाषणे झाली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला वर्षपूर्ती झाल्या निमित्त हवेत तिरंगा फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.