
Ahmednagar Corporation: शिवराष्ट्र सेनेचे उपोषण स्थगित
Ahmednagar Corporation: अहमदनगर (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन निधीमधील अनियमिततेची चौकशी सुरू करण्यात आली असल्याबाबतचे पत्र मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडून शिवराष्ट्र सेना उपोषणकर्त्यास देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी शिवराष्ट्र सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, राकेश सारवान, संतोष त्रिंबके, मनोज औशीकर, महिला आघाडी प्रमुख सुनिता चव्हाण, नवनाथ मोरे, अरुण चव्हाण यावेळी उपस्थित होते.
गेल्या तीन महिन्यापूर्वी शिवराष्ट्र सेना पक्षाकडून जिल्हाधिकार्यांना या मनपा आपत्ती व्यवस्थापन निधीमध्ये अनियमित्ता व बर्याच प्रमाणात घोटाळा असल्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर जिल्हाधिकारी साहेब यांनी त्वरित दखल घेऊन जिल्हा परिषद लेखा अधिकारी यांच्यासह आठ जणांची चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली होती.
परंतु जिल्हाधिकारी साहेबांचे एकूण चार पत्र जाऊन देखील मनपा आरोग्य विभागाने समितीला गेल्या दोन ते तीन महिन्यापासून याबाबतचे कुठल्याही प्रकारचे दप्तर तपासण्या करता दिले नव्हते.
शेवटी जिल्हा परिषदेतील लेखा परीक्षकांनी जिल्हाधिकार्यांना पुन्हा पत्र पाठवले व मनपा या कामी कुठलेही सहकार्य करत नाही व कोणतेच दप्तर देत नाही अशा आशयाचे पत्र पाठवले. या पत्रावर पुन्हा मनपा आयुक्त यांना जिल्हाधिकारी साहेबांनी पुन्हा चौथे पत्र पाठवले तरी देखील मनपाने आपले कोविड निधीचे आपत्ती व्यवस्थापन निधीचे दप्तर देण्याची टाळाटाळ केली.
यानंतर शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने मनपा कार्यालयासमोर याबाबत आमरण उपोषण सुरू केले. गेले दोन दिवस हे उपोषण सुरू होते. यानंतर मनपाने जिल्हा परिषद लेखा अधिकारी यांना व्यवस्थापन निधीचे दप्तर देण्यात आले. यानंतर शिवराष्ट्र सेना पक्षाच्या उपोषणकर्त्यांस तशा आशयाचे पत्र देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.