
Divyang Pension: अहमदनगर (प्रतिनिधी): माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेने अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या संकल्पनेतून, नगर तालुक्यातील सर्व गावात संजय गांधी निराधार अनुदान समिती घराघरात जाऊन दिव्यांग माता-भगिनी तसेच दिव्यांग नागरिक, तरुण मुले यांच्यासाठी असणार्या शासनाच्या विविध प्रकारच्या योजना ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. संजय गांधी निराधार अनुदान पेन्शन रु. 1500/- तळागाळातील दिव्यांगा पर्यंत लाभ मिळून देण्यासाठी ‘पेन्शन योजना दिव्यांगांच्या दारी’ उपक्रम राबविणार असल्याचे नगर तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य प्रा.वसंत शिंदे यांनी सांगितले.
निंबोडी येथे दिव्यांगांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी प्रा.वसंत शिंदे बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी भोजने, संतोष शेंडगे, मोहन शेंडगे, राजू घोरपडे, दादावा शेंडगे, योहान भिंगारदिवे, संगीता जाधव, कलावती पोकळे, कौशल्य बोर्डे, छाया जाधव, बाळू शेंडगे तसेच बहुसंख्याने माता व भगिनी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रा.शिंदे म्हणाले, आज बर्याच प्रमाणात आमचे दिव्यांग बांधव घरात बसून आहेत, त्यांना तलाठी कार्यालयापर्यंत चालत जाणे मुश्कील आहे. कसल्याही प्रकारचे उपजीविकेचे साधन त्यांच्याकडे नसल्याने आजही हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दिव्यांगासाठी असणारी बीज भांडवल योजना किंवा ग्रामपंचायमधून मिळणारा 5 टक्के निधी अशा सर्व योजनापासून आजही आमचा दिव्यांग कोसो दुर आहे. याकरिता आम्ही सर्व सदस्य गावागावत जाऊन घराघरापर्यंत पोहचून दिव्यांग बंधू भगिनीपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्याचा मानस केला आहे. जेणे करून कोणताही लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचीत रहाणार नाही.
आजच्या मितीला जर प्रत्येक गरजू व खर्या दिव्यांग बंधू -भगिनीपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान पेन्शन 1500 रु. मिळाली तर नक्कीच – त्यांना जगण्यासाठी एक वेगळी दिशा मिळेल. पेन्शन करिता लागणारा फॉर्म असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, सर्व फॉर्म व कागदपत्र तयार झाल्यावर फॉर्म ऑनलाईन करण्याची प्रोसेस असेल या सर्व बाबी समिती मोफत करून, नियमात असणारे दिव्यंगाची प्रकाराने लगेच मंजूर कण्यात येणार आहेत, असे प्रा.वसंत शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी भोजने यांनी केले तर शेवटी आभार संतोष शेंडगे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.