
डॉ. विखे कृषि महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत मुलींमध्ये धुळे संघ तर मुलांमध्ये पुणे संघाचे वर्चस्व
Dr.Vikhe Agri College: अहमदनगर (प्रतिनिधी): डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुध्दीबळ स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत मुलींमध्ये कृषि महाविद्यालय, (धुळे) संघाने प्रथम क्रमांक तर कृषि महाविद्यालय (मुक्ताईनगर) व्दितीय व कृषि महाविद्यालय (पुणे) यांनी तृतीय क्रमांक पटकाविले.
मुलांमध्ये – कृषि महाविद्यालय (पुणे) व कृषि महाविद्यालय (बारामती)- प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. तर के.के.वाघ कृषि महाविद्यालय (नाशिक) व कृषि महाविद्यालय (फलटण) व्दितीय क्रमांक विभागून व डॉ. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (तळसंदे) व कृषि महाविद्यालय, (धुळे) तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या संघाना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मान चिन्ह पदक व प्रशस्ती प्रत्रक देवून गौरविण्यात आले.
बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयबीएमआरडीचे सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्रसिंग परदेशी, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी, डॉ. महावीरसिंग चौहान तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्रसिंग परदेशी बोलतांना म्हणाले की, आजच्या धावत्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे तसेच विद्यार्थ्यामध्ये मानसिक ताणतणाव वाढत चाललेला आहे त्याकरीता विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवनात आनंद राहतो तसेच शरीर देखील सदृढ राहते खेळ हे खेळण्यासाठी असतात जिंकण्यासाठी नसतात तर आपल्या क्षमता यातून ओळखता येते. असे सांगून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग प्रत्येक खेळात घेतला पाहिजे, असे सांगितले.
डॉ. चौहान म्हणाले की, ज्या विद्यार्थ्याना पारितोषिक मिळाले त्यांनी जास्त आनंदी होवून न जाता यापेक्षा अधिक आपण चांगले खेळ खेळून उच्चपातळीवर कसे पोहचू शकतो याचा विचार करून सराव करावा. ज्या संघाना बक्षीस मिळाले नाही त्यांनी पुन्हा जोमाने सराव करून स्पर्धेस सहभागी होवून बक्षिस मिळविण्याची महत्वकांक्षा ठेवली पाहिजे, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. धोंडे म्हणाले की, डॉ. विखे पाटील फौंडेशन मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या क्रिडा संकुलात उपलब्ध असून खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करून दिल्यामुळे भविष्यात नक्कीच खेळाडूना राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळाडू म्हणून खेळण्यास संधी उपलब्ध होईल असे सांगून विजयी खेळाडूचे व संघाचे अभिनंदन केले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर एकूण 10 जिल्हयातील 67 कृषि व कृषि सलग्न महाविद्यालयाचे बुध्दीबळ स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. एच.एल. शिरसाठ व डॉ. दिपीका मावळे यांनी केले. आभार डॉ. डी.एम. नलावडे यांनी मानले. स्पर्धेसाठी संस्थेचे प्रभारी सचिव तथा संचालक डॉ पी.एम. गायकवाड, उपसंचालक (तंत्र) प्रा. सुनिल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.