
Ganj Bazar: दुरावस्थेची पाहणी करत व्यापारी, भाजीविक्रेते, नागरिकांशी काँग्रेसने साधला संवाद ; आयुक्तांची भेट घेऊन लक्ष वेधणार
Ganj Bazar: अहमदनगर (प्रतिनिधी): मध्यवर्ती बाजारपेठेत गंज बाजारात असणाऱ्या भाजी मंडईच्या
दुरावस्थेची पाणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली. यावेळी व्यापारी, भाजीविक्रेते,
नागरिकांनी काळेंसमोर तक्रारींचा अक्षरशः पाढा वाचला. भाजी मंडई मोडकळीस आली आहे.
अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याची गळती सुरू आहे. भाजीचे ओटे उध्वस्त झाले आहेत.
जनावरांचा गोठा झाला आहे. जनावरांचे मलमूत्र साचले आहे. त्यामध्ये झालेल्या अळया,
किडे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
महात्मा फुलेंच्या नावाने असणाऱ्या भाजी मंडईच्या या दयनीय अवस्थेला मनपा जबाबदार असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
काँग्रेस कार्यकर्ते,व्यापारी, भाजीविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी काळे यांच्यासह गंज बाजार व्यापारी संघटनेचे राजेंद्र नगरकर, सोमनाथ मैड,
मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, सुनील क्षेत्रे,
काँग्रेस उद्योग व व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनुषसुखशेठ संचेती,
रतिलाल भंडारी, उषाताई भगत, राणीताई पंडित, पुनमताई वनंम, सुनीताताई भाकरे,
विलास उबाळे, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, प्रणव मकासरे, आनंद जवंजाळ,
किशोर कांबळे, आकाश गायकवाड, सोफियान रंगरेज, इंजि. सुजित क्षेत्रे, रेखाताई जाधव,
समीर सय्यद, अक्षय साळवे, दीपक काकडे, जयराम आखाडे आदींसह
यावेळी काँग्रेस कार्यकर्ते,व्यापारी, भाजीविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ganj Bazar: शंभर वर्ष जुन्या असणाऱ्या मंडईच्या देखभालीकडे दुर्लक्ष
पाहणी करून व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर काळे म्हणाले की, मनपा प्रशासनाने
सुमारे शंभर वर्ष जुन्या असणाऱ्या मंडईच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे.
या ठिकाणच्या भाडेकरू व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता कोणत्याही सोयी सुविधा
त्यांना न पुरवता १४३ गाळेधारकांची एकतर्फी भाडेवाढ केली आहे.
ही अन्यायकारक बाब आहे. या भाडेकरूंना विश्वासात न घेता कोणताही प्रस्ताव
मनपाने मंजूर करू नये. कारण यापूर्वी नेहरू मार्केट, शरण मार्केट,
दिल्ली गेटचे गाळे अनेक वर्षांपूर्वी मनपाने पाडले खरे. मात्र अजूनही ते
पुन्हा बांधलेले नाहीत. त्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन ते करू शकलेले नाहीत.
त्यामुळे आधी पैशांची तरतूद, प्लॅन दाखवा. स्थानिक भाडेकरूंना विश्वासात घ्या.
मगच पुढील पाऊल टाका, असा सज्जड इशारा काळे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
“या” ठिकाणी दुर्गंधी, घाणीने वेढला गेला आहे
थोर समाज सुधारक महात्मा फुले यांचा पुतळा या ठिकाणी दुर्गंधी, घाणीने वेढला गेला आहे. ही संतापजनक बाब आहे. काँग्रेस हे कदापिही खपवून घेणार नाही. महापुरुषांचे केवळ पुतळे बसवून, त्यांचं नाव देऊन चालणार नाही. तर त्यांच्या विचारांप्रमाणे मनपा प्रशासनाने व्यापारी, भाजीविक्रेते यांना सोयी सुविधा पण देणे ही मनपाची जबाबदारी आहे. त्यापासून मात्र त्यांनी पळ काढला आहे. पुतळ्याची रंगरंगोटी करून परिसराची तातडीने स्वच्छता, डागडूजी मनपाने करावी. अन्यथा यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काळेंनी दिला आहे.
“ही” यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वातच नाही
मोकाट जनावरांसाठी मनपा दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. त्यासाठी स्वतंत्र कोंडवाडा देखील उभारला आहे. मात्र ही यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वातच नाही. त्यामुळेच मोकाट जनावरांनी मंडईतच तळ ठोकला आहे. मंडई लगत असणारा सराफ बाजार, मोची गल्ली, गंज बाजार तसेच कापड बाजार या सगळ्या परिसरात मधील अंतर्गत रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे. मनपा प्रशासन व्यापाऱ्यांकडून मोठ्या रक्कमेची कर वसुली करते. मात्र साधे रस्ते सुद्धा व्यापाऱ्यांना ते देत नाहीत. अनेक अपघात गर्दीच्या ठिकाणी खड्ड्यांमुळे घडतात. याचा व्यापारावर देखील नकारात्मक परिणाम होण्यास मनपाच जबाबदार असल्याचा घणाघात काळे यांनी केला आहे.
मनपाने बाजारपेठेसाठी सोयी सुविधा पुरवण्याची गरज
यावेळी काळे यांचा सराफ बाजार व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुभाषशेठ मुथा व व्यापाऱ्यांनी सत्कार केला. मुथा यावेळी म्हणाले की, मनपाने बाजारपेठेसाठी सोयी सुविधा पुरवण्याची गरज आहे. मात्र कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. किरण काळे यांनी यात लक्ष घातल्याबद्दल व्यापारी त्यांचे आभारी आहेत. सत्काराला उत्तर देताना काळे म्हणाले की, काँग्रेस जरी आज सत्तेत नसली तरी देखील व्यापारी बांधव, कष्टकरी, बाजारपेठेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस सदैव कटिबद्ध आहे. प्रश्नांच्या सोडवुकीसाठी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी काळेंनी दिले.