
Himachal Pradesh: सिमला : हिमाचल प्रदेशात यंदाच्या पावसाळ्यात अतोनात नुकसान झाल्याचे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले. या नुकसानीची केंद्र सरकारला चिंता असून या आपत्तीत केंद्र सरकार कडून निश्चीत मदत केली जाईल अशी ग्वाहीहीं त्यांनी दिली आहे.
हिमाचल प्रदेशला दोनदा पावसाच्या भीषण आपत्तीचा सामना करावा लागला आहे. मालमत्तेची मोठी हानी यात झाली असून मोठ्या प्रमाणावर जीवित हानीही झाली आहे. परंतु केंद्राने अजून या राज्याला मदतीचा हात दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर नढ्ढा यांनी या राज्याला भेट देऊन मदतीची ग्वाहीं दिली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांच्यासह नड्डा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

नढ्ढा म्हणाले की, मोठा विध्वंस आणि मानवी जीवितहानी पाहून मला दुःख झाले आहे. या आपत्तीमुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, नढ्ढा यांनी समर हिल येथील शिवमंदिर परिसराला भेट दिली. हे मंदिर भूस्खलनामुळे उद्वस्त झाले आहे. त्यांनी कृष्णनगरलाही भेट दिली. हिमाचल प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या 78 वर पोहोचली आहे. 78 मृत्यूंपैकी 24 मृत्यू एकट्या सिमल्यातील तीन मोठ्या भूस्खलनात झाले आहेत.
हिमाचल प्रदेशात 24 जून रोजी पावसाळा सुरू झाल्यापासून, राज्यात पावसाशी संबंधित घटना आणि रस्ते अपघातात 338 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 38 लोक बेपत्ता आहेत, असे राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने म्हटले आहे.
राज्यात मालमत्तेचे आणि रस्त्यांचे किमान दहा हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.