
Jalna: जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षाकडून या घटनेप्रकरणी राज्य सरकरवर टीका केली जात आहे.
यातच आता विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. जालना येथे झालेल्या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्यात यावी, यातील सर्व दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणात गृहविभागाचे अपयश असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, “जालन्यातील घटना हे गृह विभागाचे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठा समाजाचे आंदोलन शांततेच सुरू होते. आंदोलनाला पाठिंबा वाढत होता. त्यामुळे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला आहे,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची माणसिकता आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे. गेल्या वर्षभरापासून सरकार केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. या नादात सरकारचे मराठा समाजाकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.