
Maharashtra: मुंबई दि. ११: श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी श्री. सिन्हा यांची भेट घेतली.
यावेळी नायब राज्यपालांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृद्ध कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल.
महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास कश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकारतर्फे बांधण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्रात दिली आहे.