
Markendya School: अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्री मार्कंडेय विद्यालय व प्रा.बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयात १५ जून , पहिला दिवस प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पद्मशाली युवाशक्ति ट्रस्ट यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे बॅण्ड पथकासह गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या आवारात रांगोळी काढून, फुग्यांची सजावट करण्यात आली होती.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व विशद करत शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होऊन त्याची प्रगती होते. परिस्थिती बदलण्याची शक्ती शिक्षणात असून, श्रमिक कष्टकर्यांच्या मुलांनी उच्च शिक्षणाने आपला उत्कर्ष साधता येतो. अशा या गरजू, कष्टकरी विद्यार्थ्यांना पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट मार्फत वही वाटप हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. बहुतेक सर्व सदस्य हे माजी विद्यार्थी आहेत. सर्वांचे कौतुक करत , सर्वांचे ऋण व्यक्त केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप छिंदम यांनी सद्यस्थिती मांडतांना , आजही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना दरवर्षी नवीन पुस्तक, वह्या, दप्तर क्वचितच मिळत असतील. काहींची अवस्था इतकी दयनिय आहे की त्यांना पुस्तक,वही व दप्तर या वस्तु मिळतात की नाही अशी परिस्थिती असते. या अशा विद्यार्थांच्या मनात मात्र शिक्षणाची ओढ किंबहुना जिद्द असते. अशा या गरजू विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम करत, गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप उपक्रम राबविल्या बद्दल पद्मशाली युवाशक्तीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र (राजू) म्याना, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोणे, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, शिक्षक प्रतिनिधी भानुदास बेरड, ग्रंथपाल विष्णू रंगा, शिक्षकेतर प्रतिनिधी निलेश आनंदास आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टचे श्रीनिवास इप्पलपेल्ली म्हणाले ट्रस्ट मार्फत गेल्या सहा वर्षापासून दर वर्षी ४०० विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात येत आहे. तसेच पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट विविध समाज उपयोगी कार्य त्यात कोविड काळात भयंकर परिस्थिती असतांना कोरोना योध्दा म्हणून गरिब गरजु कुटुंबियांना किराणा , धान्य, व इतर गरजेच्या वस्तू पुरविण्याचे अत्यंत महत्वाचे काम ट्रस्ट मार्फत करण्यात आले. दोन वर्षापासून समाजात नवीन स्री उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पद्म उद्योजक शाॅपिंग महोत्सवाचे आयोजनही केले जाते. हा महोत्सव म्हणचे समाजासाठी एक प्रकारची पर्वणीच असते.
अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना वहीं वाटप उपक्रमातंर्गत तोफखाना, दातरंगे मळा, शिवाजी नगर, रंगारगल्ली, चितळे रोड, श्रमिकनगर, पदमानगर, सिव्हील हाडको, सिमला कॉलनी, नागरदेवळे भिंगार, नित्यसेवा या भागातील विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन वही वाटप चे कार्य केले आहे.
पद्मशाली युवाशक्तीच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, योग शिबिर, विद्यार्थ्यांसाठी करिअर व्याख्यान शिबिरे, विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ,काॅलेज युवक युवतींचा सत्कार , असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक गुंडू, सुमित इप्पलपेल्ली, योगेश ताटी, सागर बोगा, योगेश म्याकल, श्रीनिवास इप्पलपेली, नारायण मंगलारप, श्रीनिवास यलाराम, अजय म्याना, सागर आरकल, सुरेखा विद्ये, सुनंदा नागुल,उमा कुरापट्टी, सारिका सिद्द्म, निता बल्लाळ, लक्ष्मी म्याना,रेणुका जिंदम यांनी परिश्रम घेतले.