
Music: श्रुती अंतरंग बहुउद्देशीय संस्थेमार्फत तबला वर्गाचा शुभारंभ
Music: अहमदनगर (प्रतिनिधी): माणूस आनंदीत झाला की त्याच्या ओठातून गुणगुणने सुरु होते मनासारखी गोष्ट घडली कि आपोआप गाणं म्हणून आनंद व्यक्त करता येतो. स्वर, ताल याला शास्त्रीय संगीताची जोड मिळाली की गाणं परिपूर्ण होते. त्यामुळे संगीताला जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. संगीत हे जीवनाचे टॉनिक असल्याने त्याचे श्रवण केल्याने मन प्रसन्न होत असते, असे प्रतिपादन डॉ.वसंतराव गोसावी व संत ज्ञानेश्वर संगीत विद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.आर. एन. भनगडे यांनी केले.
सावेडी, सिव्हील हडकोतील गणेश चौकात श्रुती अंतरंग बहुउद्देशीय संस्थेमार्फत तबला वर्गाचा शुभारंभ गुरुवर्य आर.एन. भनगडे (संगीत अलंकार) यांचे उपस्थित व (तबला अलंकार ) गुरुवर्य प्रा.अनिल डोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.पी.एस.गायकवाड, उपाध्यक्षा डॉ.सौ.मृणाल भावसार, सचिव प्रा.प्रशांत बंडगर, श्री पवन नाईक, सरगमप्रेमी संस्थेचे अध्यक्ष राम शिंदे, श्री. कल्याण मुरकुटे, रामभाऊ तांबोळी, सुधाकर शिंदे तसेच संस्थेचे सर्व सभासद व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा अनिल डोळे म्हणाले, गाण्याशिवाय संगीत तर संगिता शिवाय गाणे हे अपूर्ण आहे. हे दोन्ही शिवाय आपले जीवनात रंग भरत नाही. शास्त्रीय संगीत ऐकतांना त्यातील तबला ऐकला तरी उत्साह निर्माण होतो. तेव्हा संगित ऐका व शिका, असे ते म्हणाले.
प्रा.पी.एस.गायकवाड यांनी प्रास्तविकात सांगितले की, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळामार्फत गायन व हार्मोनियम वादन प्रशिक्षण सुरु असून, दर बुधवारी प्रा अनिल डोळे हे तबला वादन विषयाचे वर्ग घेत आहेत. तरी त्याचा लाभ संपूर्ण शहरातील तसेच बाहेरील होतकरु विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.
या प्रशिक्षण वर्गाबाबत माहितीसाठी (मो.9881776739) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रा.पी एस गायकवाड यांनी केले.