
Padmashri Award: कोल्हापूर (जयसिंगपूर) (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मौजे धरणगुत्ती गावचे सुपुत्र डॉ. सुनील दादा पाटील यांचे भारत सरकारकडून दिल्या जाणार्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्कारासाठी साहित्य विभागातून नामांकन झाले आहे.
डॉ. सुनील दादा पाटील मागील २५ – ३० वर्षांपासून अत्यंत प्रभावीपणे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. वाचन हा जवळपास प्रत्येकाचा छंद असतो. पण, या वाचनालादेखील काही मर्यादा असते, वाचनासाठी वेळ मिळावा म्हणून सुट्ट्यांची प्रतीक्षा असते.
डॉ. सुनील दादा पाटील यांनी आपला वाचन – लेखन हा छंद जोपासण्यासाठी ‘प्राचार्य’ पदाची नोकरी सोडली आणि खास पुस्तकांसाठी स्वतंत्र घर बांधून वाचन चळवळीमध्ये सध्या ते कार्यरत आहेत. नोकरीत आतापर्यंत खूपच संघर्ष केला, ताणतणाव झेलला. पण, यापुढील आयुष्य वाचन – लेखन या छंदासाठी व्यतीत करणार असल्याचे डॉ. सुनील दादा पाटील यांनी याप्रसंगी म्हटले आहे.
डॉ. सुनील दादा पाटील हे १९९० नंतर गंभीरपणे लेखन करणारे कवी आहेत. त्यांनी आजपर्यंत शेकडो पुस्तकांचे संपादन आणि लेखन केले असून काही हजार पुस्तकांचे मुद्रण आणि प्रकाशन केले आहे. त्यांच्या या साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानासाठी भारत सरकारकडून दिल्या जाणार्या अत्यंत महत्त्वाच्या ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्कारासाठी नामांकन झाले असून त्याबाबतचा अधिकृत ईमेल राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली यांच्याकडून त्यांना नुकताच प्राप्त झाला आहे.
सुदृढ आणि संस्कारी समाज घडविण्यासाठी आणि वाचन संस्कृती वाढविण्यात डॉ. सुनील दादा पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी पाऊले टाकली आहेत. त्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आणि कारागृह ग्रंथालये यांना मोठ्या प्रमाणात ग्रंथ भेट पाठवून आपले अमूल्य योगदान दिले आहे. यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या साहित्य आणि प्रकाशन विषयक कार्यासाठी त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले आहेत.
एक उपक्रमशील व्यक्तिमत्त्व तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी – लेखक – संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांचे कार्य तरुणांना आदर्शवत असून संपूर्ण समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. एखाद्या व्यक्तिला जर सतत अपमानित आणि गरिबीत जीवन जगावे लागले, तर एका टप्प्यावर तो पेटून उठतो आणि त्यापुढे जी प्रगती करतो, त्यामुळे सारे जग थक्क होते!
काही माणसे जन्मताना आपल्या भविष्यासाठी लागणारे गुण घेऊन जन्माला येतात. डॉ. सुनील दादा पाटील जे जगप्रसिद्ध कवितासागर पब्लिशिंग हाउस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. त्यांना अगदी लहानपणापासूनच वाचन – लेखन क्षेत्रात रस होता. लहानपणी त्यांच्या घराची परिस्थिती अत्यंत बिकट होती. मात्र स्वत:च्या अंगमेहनत आणि कलागुणांच्या जोरावर त्यांनी आज आपले नाव कमावले आहे. अत्यंत साधेपणाने ते आपले जीवन जगत असून गुणवत्ता, साधेपणा आणि विनम्रता हे अत्यंत महत्त्वाचे गुण त्यांच्याकडे आहेत.
अलीकडे शुद्धलेखनाबाबत मोठ्या प्रमाणात अनास्था दिसत आहे. जी भाषा व लिपी आपल्या भावनांची व विचारांची वाहक आहे ती शुद्ध, स्पष्ट व सुंदर असायला हवी. पूर्वी शुद्धलेखन किंवा हस्ताक्षर सुधारण्यासाठी मेहनत घेतली जात असे: मात्र आता त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे, ज्या मुलांना चित्रकलेची आवड असते त्यांचे हस्ताक्षर सुधारण्यास जास्त मदत होते. अनेकदा हस्ताक्षराला आपल्या स्वभावाचा आरसा मानले जाते. त्यामुळे वाचन संस्कृतीसोबतच लेखन संस्कृतीकडे विविध शाळांच्या माध्यमातून ते आपली पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील यांच्यासह सातत्याने प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या कार्याची सामाजिक उपयुक्तता पाहून त्यांना अनेक मान्यवर मार्गदर्शन करत असून त्यांचे काम सर्व बाजूंनी पुढे नेण्यासाठी मौजे धरणगुत्ती गावातून त्यांना सर्व प्रकारचे पाठबळ दिले जात असल्याचे डॉ. सुनील दादा पाटील यांनी सांगितले.त्यांच्या या विशेष यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.