

पाउलबुधे विद्यालयात महादेव आमले यांचा सेवानिवृत्ती समारंभ
Retirement: अहमदनगर (प्रतिनिधी) – आयुष्याच्या प्रवासात ज्या क्षेत्रात आपण नोकरी करतो, त्या क्षेत्रात आपण आपला बहुमोल कालावधी आपले कर्तव्य म्हणून सेवा करतो, शिक्षक हे गुरु असतात. आज गुरुंना निरोप देण्यासाठी आलो असलो तरी ते शाळेतून सेवानिवृत्त झाले आहे, पण पुढील आयुष्याचा प्रवासातच त्यांना सुखाचे क्षण मिळणार आहे, असे प्रतिपादन निवृत्त पोलिस उपअधिक्षक रामेश्वर थोरात यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक महादेव आमले यांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पाडला. यावेळी सौ.पद्मा आमले यांच्यासह त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक रामेश्वर थोरात, सेवा शिक्षण मंडळाचे विश्वस्त आर.ए.देशमुख, प्रा.दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे, डॉ.के.रघुनाथ, प्राचार्य भरत बिडवे, प्रा.विष्णू मगर, दिपक परदेशी, प्रा.राजेंद्र मोरे, प्रा.सौ.आशा गावडे, प्रा.सौ.सुनिता त्र्यंबके शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री.थोरात म्हणाले, आपण फक्त नोकरीमधून निवृत्त होतो आयुष्यात निवृत्ती हा पुर्णाविराम नसून, यंग सिनिअर्स म्हणून धमाल करण्याची काही वर्षे आहेत. सेवानिवृत्ती हा एक नवीन टप्पा असतो. येथे स्व:चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु होते. आनंदाचा शोध घेत मार्गक्रमण श्री.आमले सरांनी करावे.
प्रास्तविकात प्राचार्य भरत बिडवे यांनी आमले सरांचे कार्य विसरता येणार नाही. 29 वर्षे एकाच ठिकाणी ज्ञानदानाचे काम त्यांनी केले. अखंड सेवा करताना दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग, एसएससी परिक्षेत त्यांच्या इंग्रजी व इतिहास विषयात लागलेला चांगला निकाल, महाराष्ट्र छात्र सेना कार्यात त्यांचा सहभाग, शालेय क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करीत उच्च विचारसरणी मुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात. आज ते निवृत्त झाले असले तरी ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कधीही ते कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देतांना श्री.आमले म्हणाले, स्व.नाथ पाउलबुधे यांनी सुरु केलेल्या प्राथमिक शाळेपासून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा आदर्श समोर ठेवून एकाच ठिकाणी 29 वर्षे शिक्षण देण्याचे काम माझ्या हातून घडले. चांगले विद्यार्थी या शाळेने घडविले याचा अभिमान वाटतो. निवृत्त फक्त नोकरीतून झालो, पण विद्यार्थ्यांसाठी सेवा, कार्य मी सुरु ठेवणार, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन प्रा.दिपक परदेशी यांनी केले तर प्रा.राजेंद्र मोरे यांनी आभार मानले.