
Thane News: ४०० हिंदू धर्म परिवर्तन करतील अशी परिस्थिती नाही
Thane News: दिवसेंदिवस महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मुंब्रा हा ठाण्यातला सर्वोत्तम भाग आहे. घोडबंदरपेक्षा चांगलं मुंब्रा आहे. इथलं वातावरण कलुषित करण्याचं काम सरकार करतं आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सरकारलाच हे कलुषित वातावरण हवं आहे. मी तिथला आमदार असल्याने सरकार आणखी खुश आहे.
मी जे आवाहन धर्मांतराविषयी केलं होतं त्यावर कुणीही काहीही प्रतिसाद दिलेला नाही असं कसं चालेल? असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे. एका धर्माला दुसऱ्या धर्माचा राक्षस दाखवून घाबरवलं जातं आहे असाही आरोप आव्हाड यांनी केला.
उत्तर प्रदेशातला एक अधिकारी म्हणतो की मुंब्र्यात ४०० मुलांचं धर्मांतर झालं आहे. मुंब्र्यातल्या पोलिसांना स्पष्टता द्यावी लागेल की असं काही झालं नाही. जर झालं असेल तर तुमच्या नजरेखालून मुलांचं धर्मांतर झालं तर पोलिसांना कसं कळलं नाही? हिंदू समाजावर अविश्वास दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. ४०० हिंदू धर्म परिवर्तन करतील अशी परिस्थिती नाही.
पोलिसांना बातमीच कळत नाही हा पोलिसांचा अपमान आहे. हिंदूंचा आणि पोलिसांचा अपमान केला जातो आहे. मुस्लिमांकडे संशयाने पाहिलं जातं आहे. महाराष्ट्रावर ठपका म्हणून या तीन गोष्टी आहेत असंच म्हणता येईल असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रावर जर काळा डाग पडला असेल तर तो पुसला पाहिजे. ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. महापालिका त्यांच्याकडे आहे. त्या महापालिकेत ते कधी काळी सभागृह नेते होते. मात्र हे प्रकरण गांभीर्याने कुणी घेतलीच नाही. मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर करायला हवं होतं की असं काहीही घडलेलं नाही.
Thane News: तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही हिंदू समाजाला बदनाम करताय का?
मी आमदार आहे म्हणून बोंबलतोय. मुंब्रा बदनाम करुन तुम्ही किती घाणेरडं राजकारण करत आहात? मुंब्र्यात २५ टक्के हिंदू लोकही राहतात. माझं म्हणणं स्पष्ट आहे तुम्ही हिंदू मुलांना-मुलींना अपरिपक्व समजता का? त्यांना काही कळत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही हिंदू समाजाला बदनाम करताय का? त्यांना दाखवणार हा राक्षस आहे मी आहे म्हणून तू वाचलीस, वाचलास. राक्षस दाखवण्याचे हे प्रकार चाललेत ना? ते भयंकर आहेत.
एका धर्माला दुसऱ्या धर्माचा राक्षस दाखवून घाबरावयचं
लोकसभा निवडणूक होवो किंवा विधानसभा यांचा पराभव निश्चित आहे. त्यापासून पळण्यासाठी उभं काय करायचं? तर धर्माचा राक्षस. एका धर्माला दुसऱ्या धर्माचा राक्षस दाखवून घाबरावयचं आणि तुम्ही आमच्याबरोबर राहा म्हणजे आम्हीच या राक्षसाला मारु शकतो असा राक्षसांचा खेळ सुरु आहे असाही गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.